महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हेडरी उपविभागातील नागरिकांसाठी प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोस्टे आलदंडी येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन


- पोमकें हेडरी, बुर्गी (ये.) व पोस्टे आलदंडी हद्दीतील २८४ नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी  

- गडचिरोली पोलीस दल व शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमाअंतर्गत हेडरी उपविभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी होऊन त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोस्टे आलदंडी येथे शालीनी मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज २७ फेब्राुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून अतिदुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शालीनीताई मेघे रुग्णालय नागपूरचे डॉ. गगन गायकवाड (नेत्ररोग तज्ञ), डॉ. मयुर नागोसे (नेत्ररोग तज्ञ), डॉ. श्रिनीवास त्रिवेदी (फिजीशियन) व डॉ. राहुल कुमार (फिजीशियन) यांचे नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर मेळाव्यादरम्यान उपविभाग हेडरी येथील सुमारे २८४ नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली असून विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मेळाव्या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतज्ञांव्दारे तपासणी करण्यात येऊन एकूण ६० नागरिकांना पुढील तपासणीसाठी शिफारस करुन आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच यावेळी नागरिकांची ब्लड प्रेशर, डायबेटीस व इतर आजारांबाबत तपासणी करण्यात येऊन विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन २०२१ पासून आजपावेतो एकूण १८० आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण ४०,४७५ नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण ०५ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण १,४१२ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.

सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आलदंडीचे प्रभारी अधिकारी सपोनि. अमोल भोसले, पोमकें हेडरीचे प्रभारी अधिकारी सपोनि. पदमसिंग दुल्हत, पोमकें बुर्गी (ये.) चे प्रभारी अधिकारी पोउपनि. विकास शिरकुळे यांच्या नेतृत्वात पोस्टे आलदंडीचे पोउपनि. ईश्वर सुरवसे व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले. सदर शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos