रब्बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार प्रती हे १० हजारांची मदत : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


- २८२ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर २ लाख ३४ हजार ५६१ शेतकऱ्यांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जून ते सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेत ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी बियाणे व तत्सम खरीदीसाठी प्रती हेक्टर १० हजार रूपयांची मदत तीन हेक्टर पर्यंत करण्याबाबात २८२ कोटी १८ लक्ष रूपयांचा प्रस्ताव पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकरातून राज्य शासनाला सादर करण्यात आला. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी, पूरामुळे शेत पिकांचे तसेच शेतकऱ्यांच्या साधन सामुग्रीचे प्रचंड नुकसान झाले होते. राज्यात विदारक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्यासाठी राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे पॅकेज जाहीर करीत शेतक-यांना मदत देण्यासाठी ३१ हजार कोटी रूपयांची तरतूद केली. सदर तरतूदी अंतर्गत शेतक-यांना आर्थिक मदत करण्यासोबतच रब्बीसाठी बियाणे खरेदीसाठी देखील मदत करण्यात येत आहे. आर्थिक मदत शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
१२९९ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत -
माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत ३३ टक्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टर १० हजार प्रमाणे अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत वर्धा तालुक्यातील १५५ गावातील २८ हजार ४२ शेतकऱ्यांचे ४० हजार ४८० हेक्टर मधील नुकसान झाले होते. सेलु तालुक्यातील १६९ गावातील २६ हजार ४८० शेतकऱ्यांचे २९ हजार ४७९ हेक्टरमधील, देवळी तालुक्यातील १५० गावातील २९ हजार ८१ शेतकऱ्यांचे ४० हजार २१५ हेक्टर, आर्वी तालुक्यातील १४७ गावातील २७ हजार १७८ शेतकऱ्यांचे ३३ हजार २८० हेक्ट, आष्टी तालुक्यातील १५४ गावातील १८ हजार ८४४ शेतकऱ्यांचे १४ हजार ५९४ हेक्टर, कारंजा तालुक्यातील १२० गावातील २७ हजार २१ शेतकऱ्यांचे २६ हजार ३८३ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावातील ४१ हजार ९९ शेतक-यांचे ४७ हजार ५१९ हेक्टर व समुद्रपूर तालुक्यातील २१७ गावातील ३६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे ५० हजार ३५७ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदत मिळावी यासाठी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने २८२ कोटी १८ लक्ष रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील वंचित राहलेल्या वीस मंडळाचा देखील नुकसानग्रस्त पॅकेज मध्ये समावेश करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन कटिबद्ध -
बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. यावर्षी अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्वातोपरी मदत करीत आहे. याच मदतीचा भाग म्हणून खरीप हातचे गेल्याने रब्बीमुळे त्याला आधार मिळावा, यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना रब्बीचे बियाणे व अन्य बाबींसाठी प्रती हेक्टर ३ हेक्टर पर्यंत मदत करणार आहे. ही मदत शेतक-यांना लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार.
News - Wardha




Petrol Price




