बनावट परवानाधारक चालक अटकेत : मद्यधुंद दुचाकीस्वारामुळे बसला लागली भीषण आग, २० प्रवासी ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कुर्नूल (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात २४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या भीषण बस आगीत २० जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बसचालक लक्ष्मय्या याला पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकाला रविवारी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान या चालकाबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, त्याने बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे जड वाहन चालविण्याचा परवाना घेतल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मय्या हा फक्त पाचवीपर्यंत शिकलेला आहे. जड वाहन चालविण्यासाठी किमान आठवीपर्यंत शिक्षण आवश्यक असताना, त्याने बनावट दहावीचे प्रमाणपत्र वापरून परवाना मिळवला होता.
अपघातानंतर घटनास्थळी थांबून प्रवाशांना मदत करण्याऐवजी तो पळून गेला. जर त्याने तिथेच थांबून मदत केली असती, तर एवढ्या प्रवाशांचा मृत्यू झाला नसता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
२४ ऑक्टोबर रोजी कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरु गावाजवळ बंगळुरूला जाणारी स्लीपर बस एका मोटारसायकलला धडकली. या धडकेत मोटारसायकल बसखाली अडकून काही अंतर ओढली गेली आणि पेट्रोल टाकी फुटल्याने बसला भीषण आग लागली. बसमध्ये ४४ प्रवासी होते. या दुर्घटनेत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला.
हैदराबाद पोलिसांच्या फॉरेन्सिक तपासात समोर आले आहे की, अपघातास कारणीभूत ठरलेले दोन्ही दुचाकीस्वार शिव शंकर आणि एरी स्वामी हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी अपघाताच्या काही वेळ आधी एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून दारूचे सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली. पेट्रोल पंपावर थांबल्यानंतर त्यांनी निसरड्या रस्त्यावर वेगाने दुचाकी चालविताना नियंत्रण गमावले, ज्यामुळे अपघात झाला.
या प्रकरणात आमदार धस यांनी पोलिस तपासावर संशय व्यक्त केला असून, घटनास्थळाचे व्हिडीओ आणि फोटो मृतांच्या परिवारांना दाखवण्यात आले नाहीत, अशीही तक्रार करण्यात आली आहे.
या भीषण अपघातामुळे दक्षिण भारतात प्रवासी सुरक्षा आणि वाहन परवान्यांच्या नियमांचे पालन याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
News - World




Petrol Price




