महत्वाच्या बातम्या

 जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने थैमान


- भूस्खलनात १० ठार, ११ बेपत्ता; ढगफुटी, रेल्वे गाड्या रद्द; अमित शाह दौऱ्यावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रियासी जिल्ह्यातील माहोर येथे मोठ्या भूस्खलनामुळे अनेक घरे वाहून गेली असून सात जण बेपत्ता असल्याचे समजते. तर रामबन जिल्ह्यातील राजगड भागात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत दोन घरे आणि एका शाळेचे नुकसान झाले असून प्रशासन व बचाव पथके घटनास्थळी मदतकार्य सुरू ठेवून आहेत.

दरम्यान, बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रात्री ढगफुटी झाली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुरेझच्या तुलैल भागातही ढगफुटी झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.

पावसाचा मोठा फटका रेल्वे सेवेलाही बसला आहे. उत्तर रेल्वेने ३० ऑगस्ट रोजी जम्मू, कटरा आणि उधमपूर स्थानकांतून सुटणाऱ्या व येणाऱ्या तब्बल ४४ गाड्या रद्द करण्याची घोषणा केली. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस व पुरामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत असून कठुआ-उधमपूर दरम्यानचे रुळ तुटल्याने गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी ४६ गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (३१ ऑगस्ट) जम्मू दौऱ्यावर येणार आहेत. विक्रमी पावसानंतरच्या परिस्थितीचा ते दोन दिवस आढावा घेतील. पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. अमित शाह यांचा हा तीन महिन्यांतील दुसरा जम्मू दौरा ठरणार आहे.





  Print






News - World




Related Photos