केबीसीच्या मंचावर भारतीय महिला आइस हॉकी संघाचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : प्रसिद्ध ज्ञानप्रश्नमंजुषा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती सीझन १७ सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या सीझनमधील प्रेरणादायी कथा आणि अविस्मरणीय क्षणांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. अलीकडेच आदित्य कुमार याने सीझनचा पहिला करोडपती ठरण्याचा मान पटकावला.
आता येणारा शुक्रवारचा भाग (३० ऑगस्ट) अधिकच विशेष ठरणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या विशेष भागात भारतीय महिला आइस हॉकी संघाचा सन्मान करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या IIHF आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून या संघाने इतिहास घडवला आहे.
या भागात संघाच्या महिला खेळाडू अमिताभ बच्चन यांच्यासोबत केबीसीच्या मंचावर सहभागी होणार असून, त्यांनी लडाखच्या बर्फाच्छादित व प्रतिकूल परिस्थितीत कशा प्रकारे प्रशिक्षण घेतले, खेळाचे स्वप्न जपले आणि अखेर देशाला पदक मिळवून दिले, याची प्रेरणादायी कहाणी उलगडणार आहे.
या यशाने भारावून गेलेले अमिताभ बच्चन म्हणाले, लडाखसारख्या सुंदर पण कठीण परिसरात आइस हॉकीसारखा खेळ निवडणे सहज शक्य नसते. पण स्त्रिया काही ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. तुम्ही सगळ्या चॅम्पियन बनून इथे आल्या आहात, हा आमच्यासाठी गर्वाचा क्षण आहे.
हा भाग महिला खेळाडूंची चिकाटी, जिद्द आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा गौरव करणारा आहे. लाखो प्रेक्षकांना प्रेरणा देणारा हा विशेष भाग कौन बनेगा करोडपती सीझन १७ अंतर्गत ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सोनी टीव्ही आणि Sony LIV वर प्रसारित होणार आहे.
News - World




Petrol Price




