महत्वाच्या बातम्या

 भारताचा मानवतेचा हात : पाकिस्तानला पुराचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : शेजाऱ्यांबद्दल मोठं मन ठेवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा मानवतेचा परिचय दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असले तरी, पाकिस्तानातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अशा पार्श्वभूमीवर भारताने जम्मू-काश्मीरमधील संभाव्य पुराची माहिती पाकिस्तानला देत सतर्क केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ही माहिती पूर्णपणे मानवतेच्या आधारावर शेअर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातील पूरस्थितीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे भारताच्या या निर्णयामुळे नागरिकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सिंधू करार स्थगितीनंतरही माहिती -
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला होता. त्यामुळे पाकिस्तानला पाण्याचा डेटा आणि तांत्रिक माहिती देण्याची बांधिलकी संपली. तरीदेखील मानवतेच्या भूमिकेतून भारताने महत्त्वाची माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवली.

उच्चायुक्तांमार्फत संपर्क -
करार स्थगित झाल्यानंतर अशा प्रकारची माहिती देण्यासाठी ही पहिलीच वेळ उच्चायुक्तांच्या माध्यमातून संपर्क साधला गेला. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी रविवारी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाला ही माहिती दिली.

तावी नदीचा अलर्ट -
भारताकडून पाकिस्तानला तावी नदीतील संभाव्य पुराचा इशारा देण्यात आला. नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. भारताकडून सूचना मिळाल्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने नागरिकांना सतर्क केले असून, सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.





  Print






News - World




Related Photos