महत्वाच्या बातम्या

 गोंदिया येथे आझाद हिंद एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरमुळे धुराचे लोळ : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : हावडा ते पुणे जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरमध्ये झालेल्या घर्षणामुळे धूर निघण्याची घटना गोंदिया परिसरात घडली. सायंकाळी सुमारे ५:३० वाजताच्या सुमारास गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. सुदैवाने आगीची घटना टळली असली तरी काही काळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर एक्सप्रेस गाडी गोंदिया रेल्वे स्थानकातून सुटून पुढे जात असताना, गंगाझरी स्थानकाजवळ गाडीच्या ब्रेक लायनरने रेल्वे रुळांना घास घेतल्यामुळे तीव्र घर्षण निर्माण झाले. यामुळे गाडीच्या काही भागातून धुराचे लोळ बाहेर येऊ लागले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन लोकोपायलटने तत्काळ गाडी थांबवली.

गाडी थांबताच, धुराचे लोट पाहून अनेक प्रवासी घाबरले आणि गडबडीत गाडीतून खाली उतरले. काही वेळासाठी अफवांचेही वारे पसरले. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी करून हा केवळ ब्रेक लायनरमधील घर्षणामुळे झालेला प्रकार असल्याचे स्पष्ट केले. गाडीत आग लागलेली नसल्याने कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही.

रेल्वे प्रशासनाने गाडीचे ब्रेक यंत्रणा तपासून ती पुन्हा सुरक्षित मार्गस्थ केल्याचे सांगितले. ही संपूर्ण घटना नियंत्रणात आल्यामुळे गाडीने पुढील प्रवास पुन्हा सुरू केला.

संपर्क साधता आलेल्या प्रवाशांनी सांगितले की, धुरामुळे सुरुवातीला आम्हाला वाटले की गाडीत आग लागली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. परंतु काही वेळातच रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थिती नियंत्रणात आणली आणि आम्हाला दिलासा मिळाला.





  Print






News - Gondia




Related Photos