सुखी जीवनाचा मार्ग धम्मात : समाधान आणि सन्मानाने जगण्याची कला धम्म शिकवतो : आ. किशोर जोरगेवार


- वर्षावास काळात उपासथ व्रताचे पालन करणाऱ्या उपासक-उपासिकांचा भाजप महानगर कार्यालयात सन्मान; भंते धम्मघोष मेहता व संघाची विशेष उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : माणसाकडे कितीही संपत्ती, साधनसंपत्ती आणि सुखसोयी असल्या तरी तो खऱ्या अर्थाने सुखी असेलच असे नाही. खरे सुख हे बाह्य गोष्टींमध्ये नसून जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आणि मनाच्या समाधानात असते. समाधानाने जीवन जगण्याची कला आणि मनःशांतीचा मार्ग धम्म शिकवतो. वर्षावास काळात उपासथ व्रताचे पालन करताना चित्तशुद्धी साधली जाते. मनात चांगले विचार रुजण्यासाठी शरीर आणि मनाचे शुद्धीकरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महानगर कार्यालयात वर्षावास काळात उपासथ व्रताचे श्रद्धेने पालन करणाऱ्या उपासक आणि उपासिकांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंते धम्मघोष मेहता व संघाची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना धम्म, मानवता, आत्मसंयम, समाधान आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचे महत्त्व विशद केले.
यावेळी भाजपचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्ष विमल कातकर, नगरसेविका सविता कांबळे, शितल गुरनुले, ज्योती जिवने, नगरसेवक भालचंद्र दाणव, निलिमा वनकर, हेमलता खोब्रागडे, शालिनी राऊत आदी उपस्थित होते.
आमदार जोरगेवार म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सुखाच्या मागे धावत असते; मात्र खरे समाधान कशात आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्माचा मार्ग माणसाला स्वतःकडे पाहण्याची, स्वतःच्या विचारांचे परीक्षण करण्याची आणि जीवनात संयम व समाधान निर्माण करण्याची शिकवण देतो. वर्षावास हा केवळ धार्मिक आचरणाचा काळ नसून आत्मचिंतन, आत्मशुद्धी आणि सद्विचारांची जोपासना करण्याची संधी आहे.
उपासथ व्रताचे पालन करताना चित्तशुद्धीबरोबरच आचरणात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला जातो. मन शुद्ध असेल तर विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध असतील तर आचरणही चांगले घडते. धम्माची शिकवण माणसाला आत्मपरिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाते. वर्षावास काळात उपासक-उपासिकांनी केलेले व्रतपालन हे त्यांच्या आत्मसंयम, श्रद्धा आणि धम्मनिष्ठेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मानवी जीवनातील संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, माणूस दुसऱ्याचे दुःख समजू शकतो आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्नही करू शकतो. दुसऱ्याच्या वेदना जाणून घेणे, अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हीच मानवतेची खरी ओळख आहे. केवळ स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अधिक महत्त्वाचे आहे.
यावेळी त्यांनी वरोरा येथील आनंदवनातील एका दिव्यांग बांधवाच्या गीतगायनाचा अनुभवही सांगितला. ते म्हणाले की, आनंदवनातील एका कार्यक्रमात दोन हात नसलेला आणि डोळ्यांनी दिसत नसलेला दिव्यांग बांधव या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत सादर करत होता. अनेक शारीरिक मर्यादा आणि अडचणी असूनही त्या व्यक्तीने जीवनावर प्रेम करण्याचा दिलेला संदेश मनाला भावणारा होता.
या अनुभवातून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगत ते म्हणाले की, काही लोकांकडे सर्व सुखसोयी असूनही ते जीवन जगणे कठीण असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे अनेक अडचणी असतानाही काही व्यक्ती आयुष्यावर मनापासून प्रेम करतात. त्यामुळे आयुष्यात काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचे महत्त्व ओळखून समाधानी राहणे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणे अधिक महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी वर्षावास काळात श्रद्धेने आणि निष्ठेने उपासथ व्रताचे पालन करणाऱ्या उपासक-उपासिकांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या संयम, साधना आणि धम्माप्रती असलेल्या समर्पणाचे आमदार जोरगेवार यांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात धम्मविचार, नैतिक मूल्ये, आत्मसंयम आणि मानवतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.




Petrol Price




