घुग्घुसच्या आशा स्वयंसेविकांचे आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच : सुमित्रा गाडगे यांची प्रकृती खालावली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : घुग्घुसच्या ३२ आशा स्वयंसेविकांच्या थकीत कोविड प्रोत्साहन भत्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा बुधवारी आठवा दिवस होता. मात्र, १२ महिन्यांचा थकीत भत्ता अद्याप मिळालेला नसल्याने आशा स्वयंसेविकांमध्ये संताप वाढत आहे. दरम्यान, आंदोलनात सहभागी असलेल्या सुमित्रा गाडगे यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना घुग्घुस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीची स्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे आंदोलनकर्त्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आपल्या हक्काच्या पैशांसाठी आशा स्वयंसेविका गेल्या आठ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस आंदोलन करीत आहेत. कोविड महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करणाऱ्या या महिलांना आज मात्र स्वतःच्या मेहनतीचा मोबदला मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. घरगुती जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक अडचणी बाजूला ठेवून त्या न्यायाच्या मागणीसाठी आंदोलनस्थळी ठामपणे बसून आहेत.




Petrol Price




