शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं : सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भाजपला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भाजपचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाची भूमिका मांडली. त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत, असा आरोप मुनगुंटीवार यांनी केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी केली होती. पण त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्या पुस्तकावरील वाद मिटला होता, अशी आठवणही त्यांनी विरोधकांना करून दिली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 'इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया' असं काँग्रेसचे लोक म्हणायचे. तसंच इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा मातेशीही करण्यात आली होती. त्याला मात्र कुणीच आक्षेप घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला.
छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी दिली गेली आहे. पण हीच उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. शरद पवारांच्या कार्यकाळात तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळं त्यांना जाणता राजा म्हटलेलं चालतं का? त्यांना ही उपाधी लागू होते का? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला.  Print


News - Rajy | Posted : 2020-01-13


Related Photos