काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार  बग्गूजी ताडाम यांचे  अपहरण करुन त्यांना रात्रभर  बसवून ठेवल्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आज आनंदराव गेडाम व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. यामुळे मतदानाची तारीख जवळ असताना व प्रचाराची धुमाळी सुरु असताना  माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती असलेले बग्गूजी ताडाम हे आरमोरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.   ९ ऑक्टोबर रोजी  दोन सहकाऱ्यांसह मोटारसायकलने जात असताना  रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी आपणास अडवून मारहाण केली. त्यानंतर कढोली गावाजवळच्या पुलावर नेऊन प्रचार न करण्याची धमकी दिली. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नेऊन रात्रभर बसवून ठेवले, अशी तक्रार  ताडाम आरमोरी पोलिस ठाण्यात केली . त्यावरुन पोलिसांनी १० ऑक्टोबरला रात्री आनंदराव गेडाम, त्यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व अन्य ११ जणांवर गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून आनंदराव गेडाम हे फरार होते. आनंदराव गेडाम व जीवन नाट यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-16


Related Photos