महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत रेशीम उद्योग प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (आरसेटी) शेतकऱ्यांसाठी मोफत रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधा आरसेटी या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्हा रेशीम कार्यालयांतर्गत सन २०२३-२४ या वर्षात तुती लागवड करुन रेशीम उद्योग स्वीकार केलेल्या नवीन लाभार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण हे फक्त रेशीम उद्योगाशी निगडित असणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी हा १० दिवसांचा असून संपूर्ण प्रशिक्षण निःशुल्क आहे. तसेच या कालावधीत निवास, नास्ता व भोजणाची सुविधा संस्थेच्यावतीने विनामूल्य केली जाणार आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसर, रेल्वे स्टेशन समोर, वर्धा असे आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार असून हे प्रमाणपत्र गरजू लाभार्थ्यांना बॅकेचे कर्ज घेताना उपयोगी पडेल.

रेशीम शेती अतिशय फायदेशीर आहे. कमी कालावधीत एकापेक्षा जास्त उत्पन्न या शेतीतून घेता येतात. शेतकऱ्यांना या शेतीची माहिती व्हावी व या फायदेशीर शेतीकडे त्यांनी वळावे, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी प्रशिक्षण प्रवेश अर्ज ९ सप्टेंबरपर्यंत जिल्हा रेशीम कार्यालयात सादर करुन नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos