महत्वाच्या बातम्या

 सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सद्यस्थितीत सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडी त्यासोबतच पांढरी माशी व खोडमाशी या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिल्यास तसेच दोन पावसामधील खंड पडल्यास चक्रीभुंगा, पांढरी माशी व खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

चक्रीभुंगा प्रौढ फिक्कट तपकिरी रंगाचा असतो, मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर दोन चक्रकाप तयार करून यामध्ये तीन छिद्र करते आणि त्यापैकी एकामध्ये अंडी घालते. पिवळसर रंगाची अळी पानाचे देठ, फांदी व मुख्य खोडाचा आतील भाग पोखरून खाते. चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण, दाण्याच्या संख्येत तसेच वजनात घट येऊ शकते. लवकर पेरलेल्या सोयाबीन पिकावर  चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त येतो. चक्रीभुंग्याची आर्थिक नुकसानीची पातळी फुलोऱ्यापूर्वी ३ ते ५ चक्रीभुंगा प्रति मीटर ओळ अशी आहे.

खोडमाशीची फिक्कट पिवळ्या रंगाची अळी खोडात व फांद्यात प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे किडग्रस्त झाडे वाळते. किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. शेंगेतील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात १६ ते ३० टक्के पर्यंत घट येते. खोडमाशीची आर्थिक नुकसानीची पातळी १० टक्के प्रादुर्भावग्रस्त रोपे आहे. पांढरी माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषण करतात, परिणामी झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. पांढरी माशी पिवळा मोझँक रोगाचा प्रसार करतात.

चक्रीभुंगा व खोडमाशी व्यवस्थापन करतांना किडग्रस्त झाडे, पाने व फांद्या यांचा किडीसकट नायनाट करावा. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत फुलोऱ्यार्वी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी व खोडमाशीसाठी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मिली किंवा इथिऑन ५० टक्के प्रवाही १५ मिली किंवा थायोमेथोक्झम १२.६ टक्के अधिक लॅमडा सायहलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मिली किवा इंडोक्झाकार्ब १५.८ ई.सी. ६.६ मिली किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल ९.३० टक्के  अधिक लॅमडा सायहलोथ्रिन ४.६० टक्के ४ मिली किंवा बीटासायफ्लूथ्रिन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ७ मिली. वरील पैकी कुठलेही एक किटकनाशक प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हिरवी उंटअळीसाठी फ्लूबेंडामाइड ३९.३५ एससी ३ मिली किंवा फ्लूबेंडामाइड २० डब्ल्यु.जी. ५ ते ६ ग्रॅम किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९ ई.सी. ८.५ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढरी माशीसाठी पिवळे चिकट सापळे १५x ३० से.मी. आकाराचे किवा तत्सम आकाराचे ६४ प्रती एकर याप्रमाणे लावावेत. तसेच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी रसायनिक किटकनाशके लेबल क्लेम (शिफारशीत) नसल्यामुळे वर दिलेले संयुक्त किटकनाशकामध्ये आंतरप्रवाही किटकनाशके असल्यामुळे पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन होईल, असे पिक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. निलेश वझिरे व कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. जीवन कतोरे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos