महत्वाच्या बातम्या

 वन्यजीव सप्ताह चांगल्या पध्दतीने साजरा करण्यासाठी नियोजन करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर


- वृक्ष लागवड व संवर्धन, वन्यजीव सप्ताहाचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : संपूर्ण राज्यात २ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान वन्यजीव सप्ताह राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हा सप्ताह जास्तीत जास्त नागरिक तसेच वन्यजीव प्रेमींचा सहभाग घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नियोजन करा. सप्ताहात वने व वन्यजीव संरक्षण जनजागृतीवर भर द्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड व संवर्धन तसेच वन्यजीव सप्ताह नियोजनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनसंरक्षक हरवीर सिंह, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते, सामाजिक वनीकरणचे अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक प्रणव जोशी, कौस्तुभ गावंडे, पीपल्स फॉर ॲनिमलचे आशिष गोसामी आदी उपस्थित होते.

१ ऑक्टोंबर रोजी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन मधील सफारी गेट पर्यंटकांसाठी सुरु करण्यात येणार आहे. वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी २ ऑक्टोबर रोजी सफारी गेटच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे. जास्तीत जास्त पर्यंटकांना सफारीचा लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ.भोयर यांनी दिले.

राज्यात वृक्षलागवड मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध विमागांनी सामुहीक प्रयत्नातून अधिकाधिक लागवड करावी. यासाठी योगदान देऊन उत्तम काम करणारे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी यांचा विशेष सत्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून करण्यात यावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

वन व सामाजिक वनीकरण विभागाने वन विभागाच्या जागेवर तारेचे कुंपन करुन शेजारी बांबू लागवड करावी. सेवाग्राम येथे वर्धा एमआयडीसी परिसरात वन विभागाच्या जागेवर असलेला बायोडायव्हर्सिटी प्रकल्प पर्यंटकासाठी कसा विकसित करता येईल याचे नियोजन करावे. सेवाग्राम येथील अण्णा तलावाचे खोलीकरण करुन तलावाचे सौदर्यीकरण करण्याच्या सुचनाही यावेळी डॉ.पंकज भोयर यांनी दिल्यात. शहर व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकांवर वृक्षलागवड करण्याच्या सूचना देखील केल्या.

वन्यजीव सप्ताहाचे नियोजन करतांना शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यासोबतच वन्यजीव विषयावर रील स्पर्धेचे आयोजन करावे. या जनजागृतीपर रील सोशल मीडियावर प्रसारीत कराव्यात. सोबतच छायाचित्र स्पर्धाचे सुध्दा आयोजन करावे. वन्यजीवबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होईल याबाबत नियोजन करावे, अशा सुचना यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.





  Print






Related Photos