आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
अपुरा पाऊस व भारनियमनामुळे यंदा धानपीक धोक्यात आले. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून ओरड होत असल्याने आ.कृष्णा गजबे यांनी पाठपुरावा करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या सचिवाना आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. 
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. परंतु यंदा सुरुवातीला चांगला पाऊस पडला. मात्र, नंतर पावसाने पाठ फिरवली आणि त्याचवेळी शासनाने भारनियमनही सुरु केले. यामुळे पिकाला पाणी देता आले नाही. परिणामी उष्ण व दमट हवामानामुळे धानपिकावर तुडतुडा रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आणि अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. अशी परिस्थिती असताना यंदा दुष्काळग्रस्त जिल्हे व तालुक्यांच्या यादीत गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांची नावे समाविष्ट करण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याची दखल घेत आ. कृष्णा गजबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची हे चारही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली.  ही मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त चारही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर सचिवांना दिले आहेत, अशी माहिती आ.कृष्णा गजबे यांनी दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-24


Related Photos