ट्रॅक्टर केज व्हील लावून डांबरी रस्त्यावर आणल्यास कारवाई होणार असे उप प्रादेशिक विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात पावसाळी हंगामात धान लागवड व रोवणीची कामे वेगाने सुरू असून शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, शेतातील काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॅक्टरला जोडलेले ‘केज व्हील’ न काढताच सार्वजनिक व मुख्य डांबरी रस्त्यावर आणले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून रस्त्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे ट्रॅक्टर रस्त्यावर आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), यांनी दिला आहे.
केज व्हीलमुळे ट्रॅक्टरच्या टायर व पात्यांवर लागलेली चिखलमाती मुख्य रस्त्यावर पसरते. परिणामी रस्ता घसरडा बनून दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच इतर वाहनचालकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण होतो. याशिवाय, केज व्हीलमुळे डांबरी रस्त्यांचे पृष्ठभाग खराब होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शेतकरी व ट्रॅक्टर चालकांना सार्वजनिक रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरवरील केज व्हील काढण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यास ट्रॅक्टरची वाहतूक डंपर किंवा ट्रकद्वारे करावी. तसेच मुख्य रस्त्यावर चिखल अथवा माती पसरणार नाही, याची दक्षता घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यात धुके, ढगाळ वातावरण आणि कमी दृश्यमानतेमुळे अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे सर्व ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मागील बाजूस लाल रंगाचे रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टी लावणे अनिवार्य असल्याचेही RTO ने स्पष्ट केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पहाटे रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे गंभीर अपघात घडू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून शेतकरी, ट्रॅक्टर चालक व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन व प्रादेशिक परिवहन अधिकारी भंडारा यांनी केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




