आर्वीत धक्कादायक घटना : मृत घोषित केलेल्या व्यक्तीने अंत्यसंस्कारापूर्वी उघडले डोळे, पुन्हा तपासणीत मृत घोषित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आर्वी शहरातील विठ्ठल वॉर्डात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीने अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान अचानक डोळे उघडल्याने कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्यानंतर त्यांना तातडीने पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना पुन्हा मृत घोषित केले.
मनोज उत्तमराव बोरकर ४० वर्ष रा. विठ्ठल वॉर्ड, आर्वी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मनोज बोरकर हे आर्वी येथील ताज बेकरी येथे काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुले आणि आप्तपरिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज बोरकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना मंगळवारी पहाटे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.
डॉक्टरांच्या माहितीनंतर कुटुंबीयांनी अत्यंत दुःखी मनाने मनोज यांचा मृतदेह घरी आणला. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी त्यांच्या घरी गर्दी केली. घरात अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक मनोज यांनी डोळे उघडले आणि त्यांचा श्वास सुरू झाल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले.
मृत घोषित केलेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचे पाहून कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. उपस्थित नागरिकांनाही या घटनेने मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी कोणताही विलंब न करता मनोज यांना तातडीने पुन्हा आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुन्हा त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर नियमानुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुष्पक खवशी यांनी सांगितले की, पहाटे कुटुंबीय रुग्णाला रुग्णालयात घेऊन आले होते. तपासणीदरम्यान रुग्णाचा पल्स जाणवत नव्हता तसेच इतर कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंत कुटुंबीयांनी रुग्णाला पुन्हा रुग्णालयात आणले असता तपासणीत तो मृत अवस्थेत आढळला आणि नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, मृत घोषित केल्यानंतर काही वेळाने व्यक्तीने डोळे उघडल्याच्या या घटनेमुळे आर्वी शहरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या घटनेमागील नेमके वैद्यकीय कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
News - Wardha




Petrol Price




