घरातून सुरू होता प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यवसाय : गोंडपिपरी पोलिसांच्या छाप्यात मुद्देमाल हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका इसमावर धडक कारवाई करत २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संघराज केशव तेलसे ५० वर्ष रा. फुरडी हेटी, ता. गोंडपिपरी, जि.चंद्रपूर याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार १८ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत मौजा फुरडी हेटी येथील संघराज तेलसे हा आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गोंडपिपरी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान आरोपीच्या घरातील एका खोलीत होला हुक्का या ब्रँडचे १ किलो वजनाचे १४ सीलबंद पॅकेट प्रत्येकी १,३२५ रुपये किमतीचे, एकूण १८ हजार ५५० रुपयांचे, तसेच ईगल तंबाखूचे ४०० ग्रॅमचे ८ पॅकेट प्रत्येकी ८५० रुपये किमतीचे, एकूण ६ हजार ८०० रुपयांचे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत २५ हजार ३५० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(९), ३०(२)(३) आणि ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस हवालदार अनुप कवठेकर, पोलीस अंमलदार सचिन झाडे, सुनील गव्हारे, चासफौ पुनेश्वर कुळमेथे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




