महत्वाच्या बातम्या

 सहकारी बँकांच्या योजनांचा लाभ घ्या; आर्थिक स्वावलंबनासाठी सहकार महत्त्वाचा : योगिता पिपरे


- नागपूर नागरिक सहकारी बँक, गडचिरोली शाखेच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन; महिला, शेतकरी व युवकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सहकार ही केवळ आर्थिक व्यवहाराची व्यवस्था नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाची प्रभावी चळवळ आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक, लघुउद्योजक तसेच बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकारी बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकारी बँकांच्या विविध बचत व कर्ज योजनांचा विश्वासाने लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका (माजी नगराध्यक्ष) योगिता पिपरे यांनी केले.

नागपूर नागरिक सहकारी बँक लि., गडचिरोली शाखेच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना पिपरे म्हणाल्या की, आजच्या स्पर्धेच्या युगात आर्थिक शिस्त, नियमित बचत आणि योग्य गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे. सहकारी बँकांमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध कर्ज योजनांचा उपयोग उत्पादक व्यवसाय, उद्योग व रोजगारनिर्मितीसाठी केल्यास आर्थिक स्वावलंबन साधता येऊ शकते. विशेषतः महिलांनी स्वयंरोजगार, लघुउद्योग, बचत गट आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करून कुटुंबाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, सहकार क्षेत्राने ग्रामीण व शहरी भागातील लाखो नागरिकांना आर्थिक बळ दिले आहे. सहकारी बँकांनी लोकांचा विश्वास जपत पारदर्शक, जलद आणि ग्राहकाभिमुख सेवा देणे ही काळाची गरज असून, या माध्यमातून स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळत आहे.

नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या गडचिरोली शाखेने गेल्या आठ वर्षांत ग्राहकांचा विश्वास संपादन करत उत्कृष्ट बँकिंग सेवा दिल्याबद्दल पिपरे यांनी शाखेचे विशेष अभिनंदन केले. भविष्यातही अधिकाधिक लोकाभिमुख सेवा देत जिल्ह्याच्या आर्थिक विकासात बँकेचे योगदान अधिक भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला शाखा व्यवस्थापक सचिन चोलूरवार, जनरल मॅनेजर वनकर, विजय सोमणकर, डॉ. अमित साळवे, बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने खातेदार उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व खातेदारांना शुभेच्छा देण्यात आल्या. बँकेने भविष्यातही ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत प्रगतीची नवी शिखरे गाठावीत आणि जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीत मोलाचे योगदान द्यावे, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos