राजुरात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार : आरोपीला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी अरबाज चाऊस याने काही दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर मैत्रीची विनंती पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली.
२५ जून रोजी आरोपीने मुलीला राजुरा येथे बोलावले. त्यानंतर त्याने तिला त्याच्या मित्राच्या घरी नेले. तेथे आरोपीने पीडितेला जबरदस्ती केली. या घटनेनंतर मुलगी घाबरली होती. काही दिवसांनी तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.
पीडितेच्या पालकांसह तिने राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अरबाज चाऊस याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
रविवारी रात्री पोलिसांनी आरोपीला अटक केली. सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.
अशा प्रकारच्या घटनांमध्ये घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी किंवा पालकांशी संपर्क साधावा. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




