डिझेलदरवाढीमुळे महाराष्ट्रातील मच्छीमारांचा व्यवसाय ठप्प होण्याची भीती


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : पश्चिम आशियातील युद्धामुळे ०५ मार्च २०२६ पासून बल्क कन्झ्युमर डिझेल दरात प्रती लिटर २२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे सुमारे ३.६ लाख मच्छीमारांना आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. मच्छीमार संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की, सर्वसामान्यांसारखेच त्यांना कमी दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे.
सध्या सर्वसामान्यांसाठी डिझेल ९० रुपये प्रती लिटर दराने उपलब्ध आहे, मात्र मच्छीमार सहकारी संस्थांना ११२ रुपयांहून जास्त दरात डिझेल खरेदी करावे लागते. बल्क कन्झ्युमर वर्गवारीमुळे मच्छीमारांना मोठा त्रास होत असून, मासेमारीचा खर्च प्रचंड वाढला आहे आणि अनेक बोटी समुद्रात न जाण्याच्या स्थितीत आहेत.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केली की, मच्छीमारांसाठी स्वतंत्र तिसरा प्रवर्ग तयार करून त्यांना स्वस्त दरात डिझेल पुरवावा, तसेच मत्स्य व्यवसायाला शेतीसारखे इंधन संरक्षण देण्यात यावे.
समितीचे उपाध्यक्ष प्रदीप टपके यांनी इशारा दिला की, ही दरतफावत तातडीने दूर न केली गेल्यास महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. उत्पन्नापेक्षा जास्त इंधन खर्चामुळे मच्छीमारांना समुद्रात जाणे अशक्य होईल.
केंद्र सरकारने मच्छीमारांना कृषी दर्जा दिला आहे. त्यानुसार, रिटेल किंवा होलसेल (बल्क) वर्गवारीत अडकविता, मच्छीमारांसाठी विशेष सवलतीची वर्गवारी तयार करून स्वस्त दरात डिझेल पुरवावा, अशी आग्रही मागणी टपके यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे. अन्यथा मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याची आणि किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
News - Rajy




Petrol Price




