गडचिरोली जिल्ह्यातील विनाअनुदानित शालेय क्रीडा स्पर्धांसाठी संघटनांनी नोंदणी करावी

- २ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अधिकृत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन; ४६ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सन २०२६-२०२७ या शैक्षणिक सत्रातील विनाअनुदानित शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या संघटनेच्या नावाची नोंद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात करावी. यासाठी संघटना अधिकृत असल्याबाबतची आवश्यक कागदपत्रे २ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सत्र २०२६-२०२७ मध्ये विविध स्तरांवर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये नव्याने समाविष्ट खेळांसह शासनमान्य एकूण ४६ विनाअनुदानित क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित खेळांच्या स्पर्धा जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने पार पाडण्यात येणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, त्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धांचे नियोजन प्रभावीपणे करता यावे, या दृष्टीने या स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे. स्पर्धांच्या आयोजनासाठी संबंधित खेळांच्या संघटनांचे सहकार्य आवश्यक असल्याने त्यांच्या अधिकृत नोंदणी प्रक्रियेला महत्त्व देण्यात आले आहे.
विविध क्रीडा प्रकारांचा समावेश -
या स्पर्धांमध्ये पारंपरिक खेळ, मार्शल आर्ट्स, सांघिक खेळ, क्रिकेटचे विविध प्रकार, मैदानी खेळ तसेच कौशल्याधारित क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पहिल्या गटात आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, टेक्सबॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सिंग, हाफकिडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग आणि बीच व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे.
दुसऱ्या गटात टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुन दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोविनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो (श्स्त्रांग मार्शल आर्ट), फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट, कलरीपत्तु आणि गतका या खेळांचा समावेश आहे.
या विविध क्रीडा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळांमध्ये सहभागी होऊन कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच शालेय स्तरावर क्रीडा उपक्रमांना चालना देणे आणि विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन -
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व आयोजन सुलभ होण्यासाठी संबंधित एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या अधिकृततेसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे २ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नोंदणी करावी. विहित मुदतीत नोंदणी पूर्ण झाल्यामुळे संबंधित खेळांच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक तांत्रिक समन्वय आणि आर्थिक सहकार्याचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित क्रीडा संघटनांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.




Petrol Price




