महत्वाच्या बातम्या

 राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याची ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरित करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदार संघात जाणार हे निश्चित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीव्दारे पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, वर्धेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, देवळीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियांका पवार, आर्वीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, हिंगणघाटच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, ईव्हीएमचे नोडल अधिकारी प्रशांत उरकुडे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी नितीन चौधरी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीव्दारे सर्व प्रकारच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची नोंद घेवून जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या आर्वी विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट -380 कंट्रोल युनिट -३८० व व्हीव्हीपॅट-४०४ , देवळी विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट-४१५ कंट्रोल युनिट-४१५ व व्हीव्हीपॅट -४४१ , हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट-४२६ कंट्रोल युनिट-४२६ व व्हीव्हीपॅट -४५३ व वर्धा विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट-४१३ कंट्रोल युनिट-४१३ व व्हीव्हीपॅट -४४० मशिन मतदार संघात जाणार हे निश्चित करण्यात आले.

यानंतर संबंधित विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल हे निश्चित करण्यासाठी मतदान यंत्राच्या सरमिसळीची प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली.





  Print






News - Wardha




Related Photos