पावसाच्या खंड काळात पिक उपाययोजना करा : कृषि विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्मात पेरणीची सुरुवात जूनच्या अखेरीस झालेली आहे. त्यामुळे पीक सद्यपरिस्थितीत १२ ते १५ दिवसाचे होत आलेले असून मागील ५ ते ६ दिवसापासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे घाबरून महागडी फवारणी करण्याची गरज नाही. या अवस्थेत जमिनीतील ओलावा टिकवणे आणि मुळांची वाढ चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी कृषि विज्ञान केंद्राने सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी डवरनी, कोळपणी करावे. यामुळे जमीन वापस्यावर असल्यास उथळ डवरणी केल्याने वरचा पापुद्रा फुटतो तणांचे नियंत्रण होते आणि जमिनीतील ओलावा टिकण्यास मदत होते.
शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास मातीतील ओलावा खरोखर कमी झाला आणि रोपे दुपारी सतत कोमेजू लागली तर हलके स्प्रिंकलर सिंचन द्यावे, केवळ तीन-चार दिवसाचा खंड असल्यास १९:१९:१९ युरिया पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर टॉनिकची तातडीने गरज नाही.
पाण्याचा ताण ७-१० दिवसांपेक्षा वाढला आणि सकाळच्या वेळी रोपे कोमेजू लागली तर त्यासाठी पीक कमी कालावधीचे असल्यामुळे १९:१९:१९ किंवा पोटॅशियम नायट्रेट या द्रावणाची 1 टक्के फवारणी करावी. पीक वाढीच्या दृष्टीने १२ ते २० दिवसांचा कालावधी तण नियंत्रणासाठी महत्त्वाचा आहे परंतु पीक तीव्र पाण्याच्या ताणात असेल किंवा तापमान खूप जास्त असेल तर पेरणी पश्चात तणनाशकाची फवारणी टाळावी.
ज्या भागात अत्यल्प पावसामुळे पेरणीस विलंब झाला किंवा अद्याप पर्यंत पेरणी झाली नसल्यास सोयाबीन पिकाची पेरणी उशीर उशिरात उशिरा २३ जुलैपर्यंत करता येईल. सोयाबीनच्या लवकर, अति लवकर परिपक्व होणाऱ्या वाणाचा जसे की जे एस २०-३४, जे एस ९५-६०, जे एस ९३-०५ पिडीकेव्ही अंबा, एमएयुएस ७२५ इत्यादी समावेश करणे गरजेचे आहे.
पिकांचे कीड व रोग व्यवस्थापन करतांना सोयाबीन पिकातील पैसा, वाणी, मिलिपीडस किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काडी कचरा गोळा करुन नष्ट करावा, वाणी रात्री सक्रीय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या डिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत. क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही ३७.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पंपाचे नोझेल ढिले करून रोपांभोवती वर्तुळाकार किंवा सरळ ओळीत ट्रेंचिंग, आवळणी करावी.
गोगलगाय किडीच्या व्यवस्थापनाकरिता १५ टक्के मिठाच्या द्रावणामध्ये गोणपाट बुडवून, १० गोणपाट प्रती एकर याप्रमाणे अंथरावे व दिवसा गोगलगायी गोणपाटाखाली लपण्यासाठी जमा होतात व मिठाच्या संपर्कात येऊन नष्ठ होतात किंवा जमा करून नष्ट कराव्यात.
चुन्याच्या भुकटीचा ४ इंच पट्टा शेताच्या बांधाच्या शेजारी टाकावा. मेटाअल्डेहाईड २.५ टक्के प्रमाणे रोपांवर, झाडांवर सुरक्षा साधने घालून धुरळणी करावी. खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे २५ प्रती हेक्टरी याप्रमाणात लावून नियमित खोडमाशीचा प्रादुर्भाव पाहणे. खोडमाशी प्रादुर्भावाग्रस्त झाडे, पाने व फांद्या यांचा किडीसकट नायनाट करावा.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत फुलोऱ्यापूर्वी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. सोयाबीन बियाण्यास बीजप्रक्रिया केली नसल्यास पिक १५ दिवसाचे झाल्यानंतर इथिऑन ५० टक्के प्रवाही १५-३० मी.लि. किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ई.सी. ६.७. मी.लि. किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मी.ली. यापैकी कोणतेही एक कीटकनाशकाची प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तूर पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर ट्रायकोडर्मा मित्रबुरशी २ किलो २ लिटर २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या व थोडाफार ओलावा असलेल्या शेणखतामध्ये मिसळवून घमेल्यात घेऊन एक एकर क्षेत्रफळामध्ये समप्रमाणात पसरविणे किंवा फेकून देणे किंवा ट्रायकोडर्मा मित्रबुरशी ५० ते १०० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून ड्रेचींग, आवळणी करावी.
राखाडी भुंग्याचे व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगे गोळा करून नष्ट करावे. यजमान पिकांची विशेषत: वांग्याची लागवड शेताजवळ करू नये, बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटाराईजियम यासारख्या जैविक कीटकनाशकांची जमिनीवर व पिकांवर फवारणी करावी किंवा शेणखतामध्ये मिसळून शेतात फेकून द्यावे. बायफेन्द्रीन ८ टक्के अधिक क्लोथीयानिडीन १० टक्के एस.सी. टॅलस्टार प्लस हे संयुक्त कीटकनाशक १० मिलि प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
मूळकूज व खोडकुज कॉलर रॉट रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ टक्के अधिक मँकोझेब ६३ टक्के डब्ल्यूपी १० ते १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून सरळ रेषेत किंवा बांगडी पद्धतीने ट्रेंचिंग किंवा आवळणी करावी किंवा ट्रायकोडर्मा मित्रबुरशी ५० ते १०० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून ड्रेचींग, आवळणी करावी, असे कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




