दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

- पालकमंत्र्यांच्याहस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सकस आहार प्रत्येकाच्या शरीराची गरज आहे. अलिकडे आपण सेवन करत असलेला आहार किती आरोग्यदायी आहे, याबाबत प्रत्येकाच्याच मनात शंका असते. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस, शुद्ध आणि चांगले खाद्य शरीरात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे विशिष्ट कालावधीत उपलब्ध होणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रानभाज्या प्रत्येकानेच आपल्या आहारातला एक भाग बनविले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषि विभाग व आत्माच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी आत्माच्या प्रकल्प संचालक राणी गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी रोहन झांजरे, तालुका कृषि अधिकारी चंद्रशेखर चवणे आदी उपस्थित होते.
सुरुवातीस पालकमंत्र्यांनी फित कापून महोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच प्रत्येक स्टॅालला भेट देऊन महोत्सवात ठेवण्यात आलेल्या रानभाज्यांचे महत्व आणि त्यांची गुणवैशिष्टे शेतकऱ्यांकडून समजून घेतले व त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यामध्ये पवणी येथील महिला शेतकरी प्रतिभा प्रमोद महाजन, समुद्रपुर येथील महिला शेतकरी शोभा जुगल गायधने तसेच दिपक नानाजी बर्डे, नंदकिशोर गावंडे यांचा समावेश आहे.
महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक गटातील शेतकरी, सदस्यांनी सहभागी होऊन राजभाज्या विक्री व प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. सोबत नैसर्गिक उत्पादने देखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. रानभाज्यांमध्ये कुंजर, अंबाडी, पाथरी, कारडू, कपाळफोडी, गवती चहा, शेवगा, करवंद, अळू, चिवर, गोडनिम, तरोटा, राजगिरा, आघाडा, केना, सुरण, फास बरबटी, कुकडा, घोगली, ताजे मशरुम, भूईनीम, आंबटचुका, मायाळु/पोई, माठ, गुळवेल, करवंदाचे लोणचे, अंबाडीचे सरबत, पावडर, भाकर, लोणचे, बेलाचे लोणचे, सरबत प्रदर्शनात उपलब्ध होत्या.
महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेले अंबाडी व मिक्स भाकरी ईत्यादी स्टॉल देखील मांडण्यात आले होते. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी स्वत: अंबाडीच्या भाकरीचा आस्वाद घेतला. वर्धा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन रानभाज्यांचे महत्व समजून घेतले व खरेदी केली.
News - Wardha




Petrol Price




