महत्वाच्या बातम्या

 गोकुलनगर तलावाभोवती वाढले अतिक्रमण : पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील गोकुलनगर तलाव परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत असल्याने तलावाच्या अस्तित्वावर आणि सौंदर्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तलावाच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेवर काही नागरिकांनी दुकाने थाटून व्यवसाय सुरू केले आहेत, तर काही ठिकाणी पक्की बांधकामे उभारण्यात आली आहेत.

तलाव परिसर हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून, येथे नागरिकांची नियमित वर्दळ असते. मात्र, वाढत्या अतिक्रमणामुळे परिसरातील मोकळी जागा कमी होत असून अस्वच्छता आणि गैरसोयींमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अतिक्रमणाच्या समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वारंवार लक्ष वेधूनही अतिक्रमणधारकांवर ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाडस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तलाव परिसराचे संरक्षण, स्वच्छता आणि सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाहणी करून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पालिका प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि अतिक्रमण हटविण्यासाठी कोणती कारवाई करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos