वडिलांच्या खुनाचा बदला : तलवारीच्या वारात युवकाची निर्घृण हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुका अंतर्गत पालेवाडा-हेटी येथे वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका युवकाने तलवारीने वार करून दुसऱ्या युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १६) रात्री सुमारे ८ वाजता घडली.
देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (वय २५, रा. पालेवाडा-हेटी) असे मृत युवकाचे नाव असून, आरोपी सुनील आसाराम कांबळे (वय २७) याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील कांबळे याच्या वडिलांचा सन २०२५ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात देवेंद्र ताराम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याला अटक करून कारागृहात पाठविण्यात आले होते. मात्र, तो आठ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून गावात परतला होता. याचाच राग मनात धरून सुनील कांबळे हा बदला घेण्यासाठी संधीच्या शोधात होता.
सोमवारी रात्री आरोपीने संधी साधून देवेंद्रवर तलवारीने गळा, मान, हात, पाय व पोटावर सपासप वार केले. गंभीर जखमांमुळे देवेंद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम २५, (२), २७ (३), ४ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ५, ३ (५), ६, ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पाटलासमोर कबुली -
घटनेनंतर आरोपी सुनील कांबळे हा थेट गावातील पोलिस पाटील परिमल ठाकूर यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याच्या हातातील तलवार रक्ताने माखलेली होती. माझ्या वडिलांचा जसा खून केला, तसाच मी भुरुला मारले, अशी कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी भीषण दृश्य -
पोलिस पाटील व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले असता देवेंद्र ताराम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. कोणतीही हालचाल नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
भावाचा सहभाग संशयात -
या हत्येत आरोपीचा मोठा भाऊ हंसराज कांबळे (वय ४३) याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी तो घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगितले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
News - Gondia




Petrol Price




