अहेरी तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत


- गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी केवळ कागदावरच, पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने गडचिरोली जिल्ह्यासह सर्वत्र संचारबंदी आदेश लागू केला आहे. मात्र या लाॅकडाऊनच्या काळातही गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अवैध दारूविक्रीला ऊत आली आहे. मात्र या प्रकाराकडे पोलिस प्रशासन व संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. तसेच सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही अहेरी तालुक्यातील विविध भागात अवैधरित्या दारूविक्री करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अहेरी तालुक्यात दारूविक्रीसोबतच काळ्या गुळाची तस्करी करून त्या गुळाची दारू काढण्यात येत आहे. यापूर्वी अहेरी व आष्टी येथे काळ्या गुळाची तस्करी करताना आरोपींना अटक करण्यात आली होती. आता लॉकडाऊनच्या काळातही दारूविक्री सुरू असल्याने काळ्या गुळाची तस्करी सुरू आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दारुबंदी व लाॅकडाऊन असतानाही चोरट्या मार्गाने दारूची आयात करून अहेरी तालुक्यातील विविध गावांमध्ये अवैधरित्या विकल्या जात आहे. लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कामकाज बंद असून प्रवेशबंदी आहे. मग या प्रवेशबंदीनंतरही अहेरी तालुक्यात दारूची आयात कशी होत आहे? असा गंभीर प्रश्नही सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. जीवनावश्यक वस्तू व औषधी व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू मिळणे सध्या कठीण झाले असताना मात्र अहेरी शहरासह या तालुक्यातील विविध गावांमध्ये अवैधरित्या दारू मिळत असल्याची चर्चा आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असताना अहेरी तालुक्यात व शहरात दारू येते कुठून? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अवैधरित्या दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत असून अल्पवयीन मुले व युवके दारूच्या आहारी जात आहेत. दारू व जुगारामुळे कौटुंबिक वाद व भांडणे होत असल्याने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. तरीदेखील चोरट्या मार्गाने दारूची आयात करून अवैधरित्या विकल्या जात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. दारुबंदी नसलेल्या जिल्ह्यात जेवढ्या प्रमाणात दारू मिळणार नाही त्यापेक्षा दुप्पट दारू गडचिरोली जिल्ह्यात मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अहेरी तालुक्यात तर लाॅकडाऊनच्या काळात देखील दारूचा महापूर वाहत असून जुगार व इतर अवैधधंदे सुद्धा जोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन व संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-23


Related Photos