स्थानिक गुन्हे शाखेची दारूविक्रेत्यांवर धाड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी आष्टी पोलिस स्टेशन हद्दीतील राममोाहनपूर जंगल परिसरात २२ एप्रिल रोजी धाड टाकून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राममोहनपूर जंगल परिसरात धाड टाकली असता दारूविक्रेते बिजय विश्वनाथ दास, अजय विश्वनाथ दास, मनोज माजी, सुशील सुखदेव राॅय, जगदीश भवरंजन सिकंदर सर्व. राममोहनपूर, ता. चामोर्शी स्वतःच्या मालकीची हातभट्टी लावून मोहादारू गाळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिस पथक येण्याची चाहूल लागताच दारू गाळणारे इसम जंगलात पळून गेले. स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीच्या पथकाने घटनास्थळावरून ८० हजार रुपये किंमतीची मोहा हातभट्टी दारू, ५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मोहा सडवा व २२०० रुपये किंमतीचे ड्रम व इतर साहित्य असा एकूण ६ लाख २ हजार २०० रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन आष्टी येथ महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-22


Related Photos