पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
येथून २० किमी अंतरावर असलेल्या पवनी वनपरिक्षेत्र सहवनक्षेत्र सावरला येथील कक्ष क्र ३१२ येथे आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलेचे नाव ममता नरेश शेंडे (३८)  असून ती सावरला येथील रहिवाशी आहे. आज रविवार १९  एप्रिलला पहाटे पती सोबत भंडारा- चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र सावरला कक्ष क्र ३१२ मध्ये मोहफुल वेचण्याकरीत मृतक महिला व तिचा पती हे दोघेही वेगवेगळ्या झाडात मोहफुल वेचण्यात मग्न असतांना महिलेला मागून येऊन पट्टेदार वाघाने नरडीचा घोट घेऊन जंगलाचे आत नेण्यासाठी प्रयत्न करीत असतांना महिलेने जिवाच्या आकांताने आरडाओरड करताच दुसऱ्या झाडात मोहफुल वेचत असलेल्या मृतकच्या पतीने आरडाओरड करीत वाघाच्या तावडीतून पत्नीला सोडविण्यासाठी वाघाकडे धाव घेतली असता वाघ गोंधळून महिलेला सोडून जंगलात निघून गेला.
जखमी अवस्थेत असलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी मृतक ममताच्या पतीने मदतीकरिता आरडाओरड केला मात्र जवळपास कोणीही नसल्याने पती नरेश यांनी  पत्नी ममताला खांद्यावर लादून जंगलाचे बाहेर रोडवर आणून मदतीच्या अपेक्षेने एखादा वाहन मिळतो का याची वाट पहात होता मात्र लाकडाऊन असल्यामुळे रोडवर रहदारी नसल्याने कोणतीही मदत मिळू शकली नाही यातच ममताने जगाचा शेवटचा निरोप घेतला.
ममताच्या निधनामुळे तिच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. मृतकच्या निधनामुळे एक मुलगी, मुलगा आईच्या मायेला पोरकी झाली असून मृतकच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सावरला सहवन क्षेत्रात घडलेल्या दुर्दैवी घटनेची वनविभागाने नोंद घेतली असून मृतकाचे अंतसंस्कार करण्याकरिता तातळीची मदत म्हणून पंचवीस हजाराची मदत केली असून घटनास्थळी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होसिंग, सहाय्यक वनसंरक्षक वाय. बी. नागुलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कु कोमल जाधव यांचेसह प. स.सभापती बंडू ढेंगरे, जि प सदस्या मनोरथा जांभूळकर आदींनी भेट दिली असून वनविभागाने ग्राम पंचायत च्या सहकार्याने मानव व वन्यजीव संघर्ष टाळता यावा याकरिता यापूर्वी च पत्रके व मुन्यादी दिली असल्याची माहिती वनविभागाने दिली. तसेच शक्यतो जंगलात सकाळी जंगलात जाणे टाळावे, मोहफुल  उभ्याने काळजीपूर्वक गोळा करावे असे आव्हान केले.

   Print


News - Bhandara | Posted : 2020-04-19


Related Photos