सात वाहनांमधून जनावरांची तस्करी, २० जनावरांचा मृत्यू, सात आरोपींना अटक


- १०३ जनावरांना विरूर पोलिसांनी दिले जीवदान
- जनावरांची गोशाळेत रवानगी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / विरूर स्टे. :
मागील अनेक वर्षांपासून राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. परिसरातील गरीब शेतकऱ्यांची जनावरे कत्तलखान्यात नेली जात आहेत. या गंभीर बाबीची माहिती विरूर येथील जागरूक युवकांना मिळताच विरूर पोलिसांना माहिती देवून कारवाई करण्यास भाग पाडले आहे. विरूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जनारांची तस्करी करणाऱ्या सात वाहनांतून १२३ जनावरे पकडण्यात आली. यापैकी २० जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला असून १०३ जनावरांना गोशाळेत  पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मंगेश शामराव चौधरी (२८) रा. लक्कडकोट, मेहमुद सरवर अली (३१) रा. वाकडी, रवि गोविंदा मांडवकर (३६) रा. वाकडी, मुम्तार बेग (२७) रा. लक्कडकोट, असलम शेख (४३) रा. वाकडी, सलमान सुलेमान (२६) रा. कागजनगर, शेख शमुदिन शेख हबीब (३५) रा. भाईपटार पाटन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुब्बई कोष्टाळा मार्गे तेलंगणा राज्यातील कत्तलखान्यात जनावरे नेली जात होती. विरूर पोलिसांनी सापळा रचून सहा आयशर व एक पिअ अप अशी सात वाहने पकडली. एवढ्या मोठ्या संख्येने केली जात असलेली गो तस्करी पकडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेत अंदाजे ५२ लाख ४४ हजार रूपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही जनावरे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
प्रकरणाचा तपास ठाणेदार कृष्णकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, हवालदार दिलीप बेहरे, सुरेंद्र काळे करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध गो तस्करी करणारांचे धाबे दणाणले आहेत.
 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-21


Related Photos