महत्वाच्या बातम्या

 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची होणार प्रथम स्तरीय तपासणी


- मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही निवडणुकीच्या मतदानापूर्वी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करणे आवश्यक आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची होणार प्रथमस्तरीय तपासणी होणार असून मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जिल्ह्यातील रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदार संघातील एकूण ४४६४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली असून ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतल्या जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून नागपूर जिल्ह्याकरीता १० हजार ४५० बॅलेट युनिट, ५ हजार ९०० कंट्रोल युनिट व ५ हजार ५६० व्हीव्हीपॅट ही नवीन एम ३ मतदान यंत्रे प्राप्त झालेली आहेत. नवीन एम ३ मतदान यंत्रे केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (भेल) या नवरत्न कंपनीद्वारे निर्मिती करुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार प्राप्त झालेल्या नवीन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची अॅक्सेपटन्स टेस्ट प्रोसिजर भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमीटेड या उत्पादक कंपनीच्या अभियंत्याकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. प्राप्त नवीन व या कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या जुन्या अशा सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे वाडी-हिंगणा संकुलातील गोदाम क्र. १० व १४, प्लॉट नं. पी-३२, मौजा सोनेगाव, वाडी-हिंगणा औद्योगिक क्षेत्र, नागपूर येथील ईव्हीएम वेअरहाऊस मध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार कोणत्याही निवडणूकीच्या मतदानापूर्वी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करणे आवश्यक आहे. प्राप्त नवीन व या कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या जुन्या अशा सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) १ ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. याकरीता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीकडून २० प्रशिक्षित इंजिनिअरचे पथक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) दरम्यान योग्य आढळून आलेली मतदान यंत्रेच निवडणुकीसाठी वापरण्यात येतील. प्रथमस्तरीय तपासणी दरम्यान नादुरुस्त आढळून येणारी मतदान यंत्रे कंपनीकडे परत पाठविली जातील.

नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय, राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी एफएलसीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत पत्राद्वारे सूचना देण्यात आलेली आहे. तरी राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी एफएलसीच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व प्रकिया पाहण्याचे तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबद्दल असलेल्या शंकांचे निरसन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos