विदर्भाव्यतिरिक्त राज्यातील शाळा १७ जूनपासून सुरू होणार


-  विदर्भातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर २६ जूनपासून
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई : 
शिक्षण संचालनालयाने १८ एप्रिल रोजी येत्या शैक्षणिक वर्षांसाठीच्या सुट्ट्यांसंदर्भातील परिपत्रक जाहीर केले असून  येत्या शैक्षणिक वर्षासाठी विदर्भाव्यतिरिक्त राज्यातील शाळा १७ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर २६ जूनपासून सुरू होतील. 
शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार शाळांना दिवाळीची सुट्टी २१ ऑक्टोबरपासून देण्यात यावी, असे   नमूद करण्यात आले आहे.  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षात सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार संचालनालयाने गुरुवारी सुट्यांचे परिपत्रक जारी केले. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करून उन्हाळ्याच्या सुट्या लागू करण्याच्या सूचना द्याव्यात, असे नमूद केले आहे. गणेशोत्सव वा नाताळची सुट्टी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने ठरवण्यात येईल. शाळांना उन्हाळी अथवा दिवाळी या दीर्घ सुट्यांमधून काही सुट्टी गणपती व नाताळसाठी देता येणार आहे. मात्र शाळा संहितेच्या नियमानुसार सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत; तसेच एकूण कामाचे दिवस २३० इतके होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शासकीय स्तरावरून जाहीर झालेल्या सर्वच सार्वजनिक सुट्या शाळा, ज्युनिअर कॉलेजांनी घेणे बंधनकारक असल्याचेही परित्रकात नमूद आहे. 
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सुट्यांच्या निश्चितीबाबत संबंधित मुख्याध्यापक आणि संघटनांची बैठक घेऊन सुट्या निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुट्यांचे वेळापत्रक तयार करताना जून ते मे अखेर असे शैक्षणिक वर्ष विचारात घ्यावे, अशाही सूचना दिल्या आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-20


Related Photos