रामपूर चेक येथील महिलांनी केला ८० ड्रम गुळसडवा नष्ट : १० कॅन दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातून वाहणाऱ्या प्राणहिता नदीच्या किनारी असलेल्या दारूभट्ट्या उद्दध्वस्त करून गुळसडवा आणि दारूसाठा नष्ट करण्याचा सपाटा मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे सुरु आहे. आज रामपूर चेक येथील महिलांनी याच नदीपात्रात सुरु असलेल्या दारूभट्ट्या, ८० ड्रम गुळसडवा आणि १० कॅन गावठी दारू नष्ट केली.
सलग चार दिवसांपासून तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील मुक्तिपथ गाव संघटनांद्वारे अहिंसक कृतीद्वारे दारूसाठा आणि सडवा नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रामपूर चेक या गावातही गावठी दारूचा महापूर आहे. गाव संघटनेच्या महिला सातत्याने दारूबंदीसाठी प्रयत्नशील आहेत. पण विक्रेते जुमानत नसल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरत आहे. गाव संघटन मजबूत करण्यासाठी काहीच दिवसांपूर्वी मुक्तिपथ तालुका चमुद्वारे बैठक घेण्यात आली. परिसरातील दारूसाठे नष्ट करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आसपासच्या गावातील महिलांनी गत चार दिवसात मोठ्या प्रमाणात सडवा नष्ट केला. रामपूर चेक येथील महिलांनाही यामुळे हिम्मत मिळाली. गाव शिवारातून वाहणाऱ्या प्राणहिता नदीत मोठ्या प्रमाणात सडवा असल्याची माहिती त्यांनी मुक्तिपथ चमूला दिली. त्यानुसार शुक्रवारी अहिंसक कृतीचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. आज सकाळी ९ वाजता पासून नदी परिसरात शोध मोहीम सुरु झाली. तब्बल ८० ड्रम गुळसडवा आणि १० कॅन दारू गाव संघटनेला सापडली. महिलांना पाहून दारू गाळणाऱ्यांनी पळ काढला. हा सर्व साठा नष्ट करून दारूभट्ट्याही महिलांनी उद्दध्वस्त केल्या. तसेच प्लास्टिक ड्रम जाळून नष्ट केले. अहेरी पोलीस स्टेशनचे मेजर मानकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. उन्हाळ्यामुळे प्राणहिता नदीचे पात्र कोरडे पडत आहे. नदीपात्रात असलेल्या झुडपांचा आडोसा घेत गुळसडवे लपवून ठेवण्याचे व दारू गळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पण गाव संघटनांनी हा सडवा नष्ट करण्याचा धडाका लावला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-19


Related Photos