दहा कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  महाराष्ट्रातील १० मतदारसंघांसह देशभरातील ९५ जागांसाठीच्या  दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल  गुरुवारी पार पडले. दुसऱ्या टप्प्यात देशभरातील १५ कोटी ८० लाख मतदारांपैकी ६६ टक्के म्हणजे १० कोटी ४३ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  १ लाख ८ हजार ५९० कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामकाजासाठी नेमण्‍यात आले होते. तसेच सुमारे २५ हजार पोलीस व अन्य सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. 
सर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय २ हजार १२९ इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाइव्ह वेबकास्टिंग तर १ हजार ६४१ मतदान केंद्रावरील संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले. सर्व कर्मचारी महिला असलेली ८७ सखी मतदान केंद्रे होती, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते. 

देशभरात १५ कोटी मतदार 

 दुसऱ्या फेरीतील मतदानानंतर आतापर्यंत लोकसभेच्या १८६ जागांवरील मतदान पार पडले असून, येत्या मंगळवारी, २३ एप्रिल रोजी ११५ जागांवर मतदान होणार आहे. गुरुवारी महाराष्ट्रातील दहा जागांसह तमिळनाडू (३८), कर्नाटक (१४), उत्तर प्रदेश (८), आसाम (५), बिहार (५), ओडिशा (५), पश्चिम बंगाल (३), छत्तीसगढ (३), जम्मू आणि काश्मीर (२), मणिपूर (१) आणि पुद्दुचेरी (१) या राज्यांमध्ये सरासरी ६६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. ही प्राथमिक माहिती असून मतदानाची अंतिम टक्केवारी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

राज्यनिहाय सरासरी टक्केवारी 

प. बंगाल : ७५.२७ 

मणिपूर : ७४.६९ 

आसाम : ७३.३२ 

पुद्दुचेरी : ७२.४० 

छत्तीसगढ : ६८.७० 

बिहार : ६२.५२ 

उत्तर प्रदेश : ६२.३० 

कर्नाटक : ६१.८४ 

तमिळनाडू : ६१.५२ 

ओडिशा : ५७.४१ 

महाराष्ट्र : ५७.२२   Print


News - World | Posted : 2019-04-19


Related Photos