वर्धा, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी उतरले राजूराच्या रस्त्यावर


- आदिवासींचा विराट जनआक्रोश मोर्चा 
- आरोपी व तत्सम दोषींची नार्कोटेस्ट व फॉरन्सेस टेस्ट करण्याची मागणी
- व्यापाऱ्यांनी ठेवले प्रतिष्ठान बंद 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
दीपक शर्मा /  राजुरा :
  राजुरा येथील इन्फंट जिजस हायस्कुलच्या वसतीगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आणि संस्थाचालका व सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज येथे काल दुपारी १२ वाजता विराट जनआक्रोश मोर्चा निघाला. सर्वप्रथम आंदोलकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्च्याची सुरुवात केली. पंचायत समिती येथून निघालेल्या या मोर्च्यात हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. पंचायत समिती चौक ते नाका नंबर तीन, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक होत मोर्चा जिप विद्यालयातील पटांगणात पोहचला. मोर्च्याचे चे एक टोक नाका नंबर तीन ला तर दुसरे टोक पंचायत समिती ला होते जवळपास १० ते १२ हजार लोक मोर्च्यात उपस्थित असल्याचा अनुमान आहे.  मोर्च्याचे असे स्वरूप राजूरा वासियांनी प्रथमच अनुभवले. जिप विद्यालयातील पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध समाजातील महिलानी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
राजुरा येथील व्यापाऱ्यांनी स्वरंस्फूर्तीने आप आपली प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद ठेऊन मोर्च्याला पाठिंबा दिला. राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावातील आदिवासी व बाहेर जिल्हयातून कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले होते. 
सभा सुरु होताच आयोजन समितीने व्यासपीठावर बोलाविलेल्या सर्व पुरुष नेत्यांच्या उपस्थितीला काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.श्रमिक एल्गारच्या  पारोमीता गोस्वामी, कविता मडावी, मोनाली पाटील, चित्रलेखा धंदरे, छाया सोनवणे, स्वाती देशपांडे, सुवर्णा वरखेडे, ज्योत्सना मडावी यांची भाषणे झाली. महिलांनी या प्रकरणातील आरोपींसह संस्था संचालकांवर कडक व ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली. ह्या वेळी एका पिडीत बालिकेची दुर्दैवी माता देखिल आपल्या वेदना व्यक्त करण्यास समोर आली आणि तिने ती मुलगी माझी नसून आपल्या सर्वांची आहे आणि तिची काळजी घेणे आपले कर्तव्य असून तिला न्याय मिळवून देणे हा आपला अधिकार असल्याचे साश्रुपूर्ण डोळ्यांनी आणि आर्त स्वरात सांगितले तेव्हा उपस्थित सर्वच लोकांचे डोळे पाणावले होते. आपण आता रस्त्यावर न उतरल्यास हे नराधम तुमच्या घरात गुसण्यास धजावणार आणि अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. श्रमिक एल्गारच्या पारोमीता गोस्वामी यांनी सांगितले की आदिवासी समाजावर सतत अन्याय होत असुन आता आदिवासींनीच जागृत होण्याची गरज आहे. या घटनेतील अन्यायग्रस्त महिलांनी आपल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरुध्द पुढे येऊन तक्रार नोंदवावी, न्यायाची गती हि संथ असते पण न्याय मिळणारच असे आवाहन केले. उपविभागिय अधिकारी यांनी व्यासपीठावर येऊन निवेदन स्विकारण्याची मागणी केली.शेवटी एसडीओ योगेश कुंभेजकर यांनी पीडितांच्या भावना लक्ष्यात घेऊन निवेदन स्विकारले.  या निवेदनात संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, अधिक्षक व संबधित कर्मचा-यांवर पास्को व अँट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करावा, इन्फंट काँन्हेंटची मान्यता रद्द करावी, आरोपींविरुध्द फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, डाँक्टरांवर गुन्हा दाखल करावा, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पातील अधिका-यांवर कारवाई करावी यासह अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या मोर्च्यात आमदार ॲड.संजय धोटे, आर्णी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम, माजी आमदार ॲड वामनराव चटप, शिवसेना नेते नितीन पिपरे, बबन उरकुडे, राजू झोडे, प्रभु राजगडकर, प्रमोद बोरीकर, खुशाल बोंडे, व्यापारी एसो. चे अध्यक्ष व नगर सेवक राधेश्याम अडाणिया, बापुराव मडावी, गोदरु पाटील जुमनाके, निळकंठ कोरांगे, वाघु गेडाम, भारत आत्राम, घनश्याम मेश्राम, महिपाल मडावी यांचेसह अनेक नेते उपस्थित होते. 
या मोर्च्याला भाजप, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, शिवसेना, रिपाई, गोंडवाना गणतंत्र पार्टी, विश्व हिंदू परिषद, बसपा, बजरंग दल,राजुरा व्यापारी असोसिएशन, धनगर समाज संघटना, प्रेमांजली महिला मंडळ, शेतकरी महिला आघाडी, मातोश्री महिला मंडळ, एकता महिला मंच, यांचेसह अनेक पक्ष व आदिवासी संघटना या मोर्च्यात सहभागी झाल्या. 
मोर्चाचे समापन झाल्यावर पंचायत समिती चौकात अनपेक्षित रस्ता रोको करण्यात आले. दिड - दोन तास वाहतुक ठप्प. भूक आणि विना पाण्याने व्याकुळ महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली. महिलांच्या भावनेला मन देऊन सौम्य बाळाचा वापर करून पोलिसांनी मार्ग मोकळा दिला व वाहतूक सुरळीत केली.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-19


Related Photos