बेहिशेबी रकमेच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील निवडणूक रद्द


-  निवडणूक आयोगाची कठोर कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / तामिळनाडू : 
निवडणुकीत मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी कठोर पाऊल उचलले असून तामिळनाडूतील वेल्लोर येथे गुरुवारी १८ एप्रिलला होणारी निवडणूकच रद्द केली आहे. गेल्या दोन आठवडय़ांत द्रमुकच्या नेत्यांकडून हस्तगत झालेल्या बेहिशेबी रकमेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी निवडणूक आयोगाने २०१७ मध्ये तामिळनाडूतील राधाकृष्णनगर येथील विधानसभा निवडणूक दोनदा रद्द केली होती. तसेच अण्णाद्रमुकशी संबंधित नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड होताच अरवकुडुची आणि तंजावर येथील निवडणूक पुढे ढकलली होती. २०१२ मध्ये झारखंडमधील राज्यसभेच्या दोन जागांची निवडणूकही धनप्रभाव रोखण्याच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती.
द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे कोषाध्यक्ष दुराइमुरुगन यांचे पुत्र आणि वेल्लोर येथील पक्षाचे उमेदवार काथिर आनंद यांच्या घरातून २९ मार्चला साडेदहा लाखांची बेहिशेबी रोकड हस्तगत झाली होती. तसेच १ एप्रिलला दुराईमुरुगन यांच्या निकटच्या एका व्यक्तीच्या सिमेंट गोदामातून ११ कोटी ५३ लाख रुपये हस्तगत झाले होते. ही रोकड दुराईमुरुगन यांच्या महाविद्यालयातून या गोदामात हलवण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर या मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी, अशी शिफारस आयोगाने राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपतींनी त्यानुसार वेल्लोरमधील अधिसूचना रद्द केली आहे.

   Print


News - World | Posted : 2019-04-17


Related Photos