टेकडामोटला येथे १३ दारूविक्रेत्यांच्या घरी गाव संघटनेची धाड


- साहित्य नष्ट : पोलिसांनी दिली विक्री बंद करण्याची तंबी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा :
तालुक्यातील टेकडामोटला येथे मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी १३ दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकली. आधीच सुगावा लागण्याने विक्रेत्यांनी दारू इतरत्र हलविली असली तरी अनेकांकडे दारू गळण्याचे साहित्य आढळून आले. सापडलेल्या साहित्याची महिलांनी होळी केली. असरअली येथील पोलीस कर्मचारी मडावी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.  
  टेकडामोटला हे तालुक्यातील मोठे गाव आहे. मुक्तापूर चेक, मुक्तापूर माल, सुकरली ही गावे टेकडामोटला ग्रामपंचायत अंतर्गत येतात. गावात तब्बल ४५ दारूविक्रेते आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे सातत्याने सूचना देऊनही दारूची विक्री करीत असतात. दारूविक्री बंद करण्यासाठी कायमचा तोडगा काढता यावा यासाठी काहीच दिवसापूर्वी मुक्तिपथ तालुका चामुद्वारे या गावांची क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आली. याच सुमारास गावातच सासर असलेली एक महिला दारू पिऊन नवऱ्याने खूप मारझोड केल्याने माहेरी आली होती. ती देखील या बैठकीत हजार होती. गावातील दारूविक्री बंद होत नाही तोपर्यंत महिलांना असाच त्रास होत राहणार असल्याचे महिला सांगता होत्या. त्यामुळे गावातील दारूविक्रेत्यांच्या घरी धाड मारून अहिंसक कृती करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यानुसार सोमवारी १३ विक्रेत्यांच्या घरी धाड टाकण्यात आली. असरअली येथील पोलीस कर्मचारी मडावी यावेळी उपस्थित होते. पण आधीच या अहिंसक कृतीबाबत माहिती मिळाल्याने सर्वांनीच दारूसाठा इतरत्र हलविल्याचे लक्षात आले. पण बहुतेक विक्रेत्यांकडे दारू गाळण्याचे साहित्य आढळून आले. महिलांनी ते जप्त करीत त्याची होळी केली. पोलिसांनी सर्व दारूविक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे.


पोलिसांचा विक्रेत्यांना सज्जड दम

या १३ विक्रेत्यांना मंगळवारी असरअली पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक दराडे यांनी दारूविक्री बंद करण्याची सक्त ताकीद या विक्रेत्यांना दिली. गाव संघटनेच्या महिला सातत्याने गावातील विक्री बंद करीत असतात. पण विक्रेते लपून छपून दारीविक्री करीतच असल्याने दारूविक्री बंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-16


Related Photos