राजुरा येथील वसतीगृहातील मुलींच्या अत्याचारप्रकरणी वसतीगृह अधीक्षक, सहाय्यक अधीक्षकास अटक


- २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
राजुरा येथील इन्फट जिसस संस्थेच्या वसतीगृहातील आदिवासी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणी वसतीगृहाचा अधीक्षक आणि सहाय्यक अधीक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही २०  एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अधीक्षक छबन पांडुरंग पचारे (४४) रा. रामनगर काॅलनी राजुरा याला १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली तर सहाय्यक अधीक्षक नरेंद्र लक्ष्मण विरूटकर (४०) रा. रामनगर काॅलनी राजुरा याला काल १४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
६ एप्रिल रोजी राजुरा येथील वस्तीगृहातील दोन अल्पवयीन मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना राजुरा येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणीसुध्दा मुलींची प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नसल्याचे पाहून स्त्रीरोग तज्ञांना पाचारण करण्यात आले. तपासणीदरम्यान स्त्रीरोग तज्ञांनी काही अनुचित प्रकार असल्याचे दर्शवून सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत तात्काळ राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३७६ (अ) (ब) भादंवी सहकलम ४ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.
प्राथमिक स्वरूपात अनुचित प्रकार घडला असल्याबाबत सखोल चौकशी व तपास करण्यात आला. चौकशी दरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे गुन्ह्यामध्ये ऍट्रासिटी कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली. यानंतर वसतीगृह अधीक्षक पचारे व सहाय्यक अधीक्षक विरूटकर या दोघांना अटक करण्यात आली.
सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख यांच्याकडे देण्यात आला. प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विविध पथके नेमण्यात आली आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-15


Related Photos