यावर्षी पाऊस बळीराजाला साथ देणार, पावसाची एकूण सरासरी ९६ टक्के : हवामान विभाग


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   यंदा नैऋत्य मान्सून समाधानकारक आणि सर्वदूर दमदारपणे बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदाच्या पावसाळ्यात चार महिन्यांच्या कालावधीत पावसाची एकूण सरासरी ९६ टक्के इतकी राहील, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, गेल्यावर्षी हवामान विभागाने ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता आणि प्रत्यक्षात सरासरी ९१ टक्के इतका पाऊस बरसला होता. भारतात सर्वदूर समान पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून खरीप पिकांसाठी हा पाऊस लाभदायी ठरेल, अशी शुभवार्ताही हवामान विभागाने दिली. 
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी सांगितले की, यावर्षी मान्सूनकाळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत समाधानकारक पाऊस होणार आहे. सरासरी ९६ टक्के पाऊस बरसेल. हे प्रमाण ५ टक्के उणे वा अधिक होऊ शकते. 
  याआधी स्कायमेटनेही यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. स्कायमेटने पावसाची सरासरी ९३ टक्के राहील, असे म्हटले होते. हे प्रमाण ५ टक्के कमी वा जास्त होऊ शकते, असेही स्पष्ट केले होते.   Print


News - World | Posted : 2019-04-15


Related Photos