महत्वाच्या बातम्या

 बसचे छत हवेत उडाल्याचे प्रकरण : यंत्र अभियंत्याला तडकाफडक निलंबित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस रस्त्यावर धावत असताना या बसचे छत पूर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचा व्हिडीओ २६ जुलैला व्हायरल झाला होता. आता या घटनेला जबाबदार असलेल्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत येथील विभागीय यंत्र अभियंता एस.आर. बिराजदार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

अहेरी आगाराची बस (एमएच ४० वाय ५४९४) गडचिरोली-मुलचेरामार्गे अहेरी या मार्गावर २६ जुलै रोजी धावत होती. यावेळी बसचे छत एका बाजूने निखळून हवेत उडत होते, याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शिवाय गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात एसटी महामंडळाच्या बसेस प्रवाशांना कशा गैरसोयीच्या ठरत आहेत, हेदेखील चव्हाट्यावर आले होते.

सदर प्रकरणी विभागीय यंत्र अभियंता एस.आर. बिराजदार यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात आले आहे. त्रुटींची पूर्तता न करता ही बस रस्त्यावर प्रवासी सेवेसाठी सोडणे, त्यामुळे जनमानसात एसटीची प्रतिमा डागाळणे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश २७ जुलै रोेजी जारी करण्यात आला, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.

नादुरुस्त बस प्रवाशांच्या सेवेत नकोत -

सुस्थितीत असलेल्या एसटी बसच प्रवाशांच्या सेवेसाठी सोडाव्यात, असे निर्देश राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व आगारप्रमुखांना दिले आहेत. प्रवाशांसाठी एसटी सोडताना ती दुरुस्त आहे का, याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos