धर्माच्या नावावर मतं मागणे भोवले, बसपा प्रमुख मायावती , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याना प्रचार बंदी


-  लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठी कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
  बहुजन समाज पक्षाच्या  प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धर्माच्या नावावर मतं मागून आचारसंहितेचा भंग करणे भोवले आहे. निवडणूक आयोगाने मायवती यांना १६ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजल्यापासून दोन दिवस तर योगींना तीन दिवस निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. मायावती आणि योगींवर निवडणूक आयोगाने घातलेली बंदी ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठी कारवाई आहे. 
प्रचार बंदीच्या  काळात हे दोन्ही नेते कोणताही रोड शो करू शकणार नाहीत. त्यांना निवडणूक प्रचार सभाही घेता येणार नसून निवडणूक रॅलीतही भाग घेता येणार नाही.  ही बंदी लागू होणार आहे.  निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार योगी आदित्यनाथ १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी तर मायावती १६ आणि १७ एप्रिल रोजी प्रचार करू शकणार नाहीत. बंदीच्या काळात या दोन्ही नेत्यांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. त्यांना या काळात कोणतीही मुलाखत देता येणार नाही, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. 
मायावती यांनी उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुस्लिम समुदायाला सपा-बसपा महाआघाडीलाच मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. धर्माच्या नावावर मतदान मागण्याच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मायवतींवर कारवाई करण्यात आली आहे. तर योगी यांनी विरोधकांना 'अली' आवडतो तर आम्हाला 'बजरंग' बली आवडतो, असं विधान करत धर्माच्या नावावर मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून निवडणूक आयोगानं खुलासा मागत त्यांना फटकारले होते. 
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मायावती यांच्या देवबंदमधील भाषणावर आक्षेप घेतला होता. धर्माच्या नावावर मतदान मागणाऱ्यांविरोधात आयोग काय कारवाई करत आहे? असा सवाल न्यायालयाने केला होता. या नेत्यांना केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. कठोर कारवाई का केली जात नाही? असा सवाल करत न्यायालयाने आयोगाला फटकारले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं ही कारवाई केली. 

   Print


News - World | Posted : 2019-04-15


Related Photos