महत्वाच्या बातम्या

 अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पीक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : मूग व उडीद पिकाच्या पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु. ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहील.  स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे अनिवार्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरीता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकांची, भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), विभागाने  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा तसेच बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक राहिल.

बक्षिसाचे स्वरूप : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस देण्यात येणार असून यामध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकापातळीवर प्रथम बक्षीस रु. ५ हजार, द्वितीय ३ हजार, तर तृतीय बक्षिस रु. २ हजार असणार आहे. तर जिल्हा पातळीवर प्रथम बक्षिस रु. १० हजार, द्वितीय ७ हजार तर  तृतीय बक्षिस रु. ५ हजार असणार आहे. राज्यपातळीवर प्रथम बक्षीस रु. ५० हजार, द्वितीय ४० हजार तर  तृतीय बक्षिस रु. ३० हजार असणार आहे.

खरीप हंगाम सन २०२३ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos