महत्वाच्या बातम्या

 गडचिराेली : तलाठी पदभरतीच्या जागा कमी झाल्याने आदिवासी युवक उतरले रस्त्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिराेली : तलाठी पदभरतीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा कमी करून त्या इतर प्रवर्गांना देण्यात आल्याचा आराेप करीत आज गुरुवारी २७ जुलै रोजी शेकडाे आदिवासी युवक एकत्र आले. सरकारच्या या निर्णयाचा इंदिरा गांधी चाैकात जाहीर निषेध केला.

तलाठी पदभरतीच्या सुरुवातीच्या जाहिरातीत अनुसूचित जमातीसाठी १५८ जागा हाेत्या. सर्व जागा पेसा अंतर्गत गावांसाठी हाेत्या. मात्र, शासनाने २४ जुलै राेजी नवीन पत्र काढले. त्यात अनुसूचित जमातीच्या २० जागा कमी केल्याने आता १३८ जागा आहेत. जागा कमी करण्यासाठी गडचिराेली विधानसभा क्षेत्राचे आ.  डाॅ. देवराव हाेळी जबाबदार असल्याचा आराेप युवकांनी केला. तसेच खा. अशाेक नेते व आरमाेरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे निष्क्रिय असल्याचाही आराेप करण्यात आला.

पेसा अंतर्गत सुरुवातीला काढण्यात आलेली जाहिरात पूर्ववत करावी. बिगर पेसा अंतर्गतच्या जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवाव्यात, पेसा अंतर्गत जागा वगळून ओबीसी तसेच अनुसूचित जातीच्या युवकांसाठी स्वतंत्र जागा लोकसंख्येनुसार देण्यात याव्यात, बोगस आदिवासी लोकांनी आदिवासींच्या जागा बळकावल्या आहेत व अजूनही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे. आदी मागण्यांसाठी आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनात जवळपास एक हजार आदिवासी युवक सहभागी झाले हाेते. रस्त्याच्या बाजूला गाेळा हाेत आंदाेलन केल्याने काही काळ वाहतूक प्रभावित झाली हाेती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos