महत्वाच्या बातम्या

 ६५५ किलो प्लास्टिक जप्त : ४१ हजार रुपये दंड वसूल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने घुटकाळा वॉर्ड येथील चंद्रपूर ट्रान्सपोर्ट या गोडाऊनवर बुधवार २६ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास कारवाई करून ६२५ किलो तसेच इतर ३ दुकानांवर कारवाई करून ३० किलो असे एकुण ६५५ किलो प्लास्टीक जप्त केले आहे.

आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार प्लास्टीक निर्मुलन कारवाईसाठी २ पथक तयार करण्यात आले होते. यातील उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणातील पथकास चंद्रपूर ट्रान्सपोर्ट येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा केला गेला असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. माहितीच्या आधारे पाहणी केली असता ६२५ किलो प्लास्टीकचा साठा गोडाऊन मधे आढळुन आला.बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन गोडाऊन मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

उपायुक्त मंगेश खवले यांच्या नियंत्रणातील पथकाने गुप्त माहीतीच्या आधारे गोकुळ गल्ली मधील आशापुरी प्लास्टीक येथे कारवाई केली असता डिस्पोझेबल ग्लास, प्लास्टीक पिशवी, कंटेनर, पात्र, चमचे इत्यादी प्लास्टीकचे साहित्य जप्त करण्यात आले व तिसऱ्यांदा प्लास्टीक साठा आढळल्याने २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण टॉकीज जवळील गुरुकृपा प्लास्टीक येथे दुसऱ्यांदा साठा आढळल्याने १० हजार तर टिळक मैदान येथील ओम प्लास्टिक यांच्याकडून १ हजार रुपये असा एकूण रुपये ३६ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.     

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.  

सदर कारवाई मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे, मनीष शुक्ला, अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव, डोमा विजयकर, अमरदीप साखरकर यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos