एसआरपीएफच्या जवानांबद्दल कोरची पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी वापरले अपशब्द


- एसआरपीएफच्या अधिकारी, जवानांची वरीष्ठांकडे तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी कोरची तालुक्यात नेमणूक केलेल्या राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ८ मुंबई येथील जवानांना कोरची पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी अपशब्द वापरल्याची तक्रार सिआरपीएफच्या अधिकारी व जवानांनी पोलिस महानिरीक्षक, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक तसेच अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
माहितीनुसार १० मार्चपासून राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ८ मुंबई येथील तुकडी कोरची तालुक्यात नक्षल बंदोबस्ताकरीता तैनात आहे. यानंतर निवडणूकीच्या अतिरिक्त बंदोबस्ताकरीता तैनातीचे आदेश प्राप्त झाले. आदेशाप्रमाणे गडचिरोली पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखालीली कोरची पोलिस ठाण्यात ३० मार्चपासून लोकसभा निवडणूकीच्या बंदोबस्तात जवान तैनात होते. १ एप्रिल रोजी नियमितपणे कोरची पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग व रोड ओपनिंगचे काम चोखपणे हे जवान बजावित होते. तसेच ११ एप्रिल रोजी निवडणूकीच्या दिवशीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. १२ एप्रिल पर्यंत निवडणूकीच्या काळात नक्षल कारवाया लक्षात घेता तैनात करण्यात आले होते. बेतकाठी येथे असलेल्या सेक्शन व मतदान निवडणूक कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे कोरची पोलिस ठाण्यात आणण्याचे कामसुध्दा करण्यात आले. असे असतानाही  प्रभारी पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी पोलिस बंदोबस्त व मतदान कर्मचाऱ्यांना फाॅलीन करून सर्वांसमक्ष एसआरपीएफ तुमची रोड ओपनिंग करायची लायकी नाही, नक्षल बंदोबस्त करायची लायकी नाही. तुम्ही बैल आहात, तुम्ही गडचिरोलीत येवू नका, अशाप्रकारचे शब्द वारपल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
निवडणूक काळात तीन ते चार दिवस एसआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक बंदोबस्तावर असताना पोलिस ठाण्यामार्फत जेवनाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. आपली व्यवस्था आपण करावी, असे सांगण्यात आले होते. असे असूनही एसआरपीएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागात कर्तव्यात कोणतीही कसर सोडली नाही. तरीही प्रभारी अधिकाऱ्यांच्या वागणूकीमुळे जवानांचे मनोबल खचले असून या प्रकरणाची दखल घ्यावी, अशा घटना परत घडू नये याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी राज्य राखीव पोलिस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणाबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-14


Related Photos