निवडणूक काळात बंदोबस्तावरील पोलीस जवानांची गैरसोय , पेट्रोल पंपावर उघड्यावर झोपले पोलीस जवान


-  एका पोलिसाने   वरिष्ठांना लिहिलेल्या पत्रातून  पोलिसांचा होणारा छळ आणि हालअपेष्टांचा वाचला पाढा  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  राज्यात  लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे.  मात्र निवडणुकीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची अवस्था विदारक असल्याचं समोर आलं आहे. तीन दिवस झोप नाही, उपासमारीची वेळ पोलिसांवर आली. एवढेच नाही तर विदर्भातील निवडणूक आटोपताच लगेच दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीच्या बंदोबस्तावर जवानांना रवाना करण्यात आले.  कारंजा लाड या ठिकाणी एका पेट्रोल पंपावर उघड्यावर या पोलीस जवानांना झोपावे लागले आहे.  एका पोलिसाने आपल्या वरिष्ठांना लिहिलेल्या पत्रातून बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांचा होणारा छळ आणि हालअपेष्टांचा पाढाच वाचला आहे.
पत्रात म्हटले आहे कि, १०  एप्रिलला राज्य राखीव दलाचा एक गट बंदोबस्तासाठी चिचगड पोलिस स्टेशनला पोहोचला. त्यानंतर ११ एप्रिल संध्याकाळी ६  वाजता गट पुढील बंदोबस्तासाठी गोंदियाला रवाना झाला. नक्षली ड्युटी असल्याने तिथे आराम करणं शक्य नव्हतं. निवडणूक ड्युटी संपताच गोंदियातील बोरगावातल्या बेस कॅम्पवर परतलो, पण ५  मिनिटंही आराम मिळाला नाही. तिथून लगेच पुणे ग्रामीण बंदोबस्ताला निघण्याचे आदेश मिळाले. रात्रभर प्रवास करुन पथक सकाळी चार वाजता पेट्रोल पंपात पोहोचला. पथकातील पोलिसांना सकाळचे विधीही करायला वेळ दिला नाही. कारंजा लाडपासून सकाळी सहा वाजता पुण्याकरता निघाले आणि  १३ एप्रिलला दुपारी १ वाजला तरी पोटात अन्न नाही. सतत प्रवासाने आमची शारीरिक प्रकृती आणि मानसिक स्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत खाण्याची, जेवण्याची तसंच राहण्याची व्यवस्था न करताच वरीष्ठ अधिकारी परस्पर रजेवर निघून गेले आहेत, अशी पोस्ट या कर्मचाऱ्याने लिहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. कुठेही जाताना कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतेच. पण गृहखात्याचे मंत्री म्हणून त्यांनीही पोलिसांच्या अवस्थेकडे लक्ष द्यायला हवं. निदान निवडणुकांच्या बंदोबस्तात पोटभर अन्न आणि झोपायला थोडी बरी जागा मिळेल एवढीच काय ती या पोलिसांची अपेक्षा आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-14


Related Photos