लोकसभा निवडणूक काळात नक्षल हल्ल्यात जखमी पोलिस जवानांच्या शौर्याचे पोलिस महासंचालकांकडून कौतुक


-  प्रशंसनीय कामगिरी ,प्रोत्साहनपर बक्षिस जाहीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राची निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यात पोलीस जवानांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. नक्षली हल्ल्याचा बिमोड करून भुसुरूंग स्फोटात जखमी झालेल्या  जवानांचे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कौतुक केले असून प्रोत्साहनपर बक्षीस सुध्दा जाहीर केले आहे.
   निवडणुकीतील मतदान प्रक्रियेदरम्यान नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने ठिकठिकाणी भुसुरुंग पेरुन ठेवले होते. १० एप्रिल रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा( जां.) हद्दीतील वटेली बुथ येथे पोलीस पथक  कर्तव्यावर असतांना  नक्षल्यांनी भुसुंरूंग  स्फोट घडवून आणला.  यामध्ये  सिआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक सुनिलकुमार पटेल, पोलीस कॉन्स्टेबल राजीवकुमार रंजन हे किरकोळ जखमी झाले होते.  ११ एप्रिल २०१९ रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र गट्टा( जां.) हद्दीतील  परसलगोंदी गावाजवळ दुपारी ३ वाजताच्या सुमारास मतदान प्रक्रिया पुर्ण करुन परत येत असलेल्या पोलीस पथकास लक्ष्य करीत  नक्षल्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवुन आणला. यामध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील  जवान भिमराव दब्बा,  हरीदास कुळेटी हे जखमी झाले आहेत.
जखमी जवानांवर नागपुर येथे वैद्यकीय उपचार सुरु असुन सर्व जखमी जवानांची प्रकृती स्थिर आहे. या चारही जवानांच्या कामगिरीचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी कौतुक करुन सदर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रोख स्वरूपात बक्षीस जाहीर केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-13


Related Photos