महत्वाच्या बातम्या

 शिक्षण पद्धती व शिक्षकांच्या प्रश्नांवर एक दिवसाची विशेष बैठक घेणार : शिक्षण मंत्री दीपक केसरकर 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा घडताना दिसत आहे. त्यातच राज्यातील सध्याच्या शिक्षण पद्धती व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेले शिक्षक, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे याबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दररोज अनेक प्रश्न आमदारांकडून उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊनही आमदारांचे समाधान होत नसल्याकारणाने या संदर्भातील सर्व प्रश्न लेखी स्वरुपात हे अधिवेशन संपण्याअगोदर शिक्षण मंत्र्यांकडे द्यावेत. त्यावर एक दिवसाची विशेष बैठक घेऊन हे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिले आहे.

२०२३ पर्यंत रिक्त पदे भरणार : राज्यातील शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. या संदर्भामध्ये खेद व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. राज्यातील शिक्षण पद्धती व शिक्षण क्षेत्रात रिक्त असलेली पदे याबाबत सरकार वारंवार आश्वासन देत आहे. परंतु, त्याबाबत अंतिम निर्णय होत नाही. सध्या राज्यात रिक्त असलेल्या पदाबाबत ऑक्टोंबर २०२३ शेवटपर्यंत ही सर्व पदे भरली जातील, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. विधान परिषदेमध्ये याबाबत अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता.

गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे : एकीकडे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे भरली जात नाही, तेच दुसरीकडे निवृत्त शिक्षकांना पुहा कामावर घेण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यावरून सुद्धा सभागृहांमध्ये गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सांगितले की, सरकारी शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. एका शिक्षकाला दोन ते तीन विषय दिले जातात, त्या कारणाने हवे तसे शिक्षण विद्यार्थ्यांना भेटत नाही.

गोव्यात बैठक घ्यावी : राज्यात एकंदरीत शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यातील सर्व त्रुटी व समस्या या संदर्भामध्ये सर्व आमदारांना लेखी निवेदन करण्याचे आवाहन केसरकर यांनी केले आहे. अधिवेशनानंतर एक दिवसाची बैठक घेऊन हे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु ही बैठक कुठे होणार याविषयी ठरले नाही. ही बैठक गोवा येथे घेण्यात यावी, असा टोला ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी केसरकर यांना लगावला आहे. त्याचबरोबर पुढे सांगताना केसरकर यांना गोव्यामध्ये बैठका घेण्याचा अनुभव असल्याकारणाने ही बैठक तिथे घ्यावी, असेही ते म्हणाले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos