महत्वाच्या बातम्या

 मणिपूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर : बीएसएफ जवानाकडूनच महिलेचा विनयभंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मणिपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माणिपूरमधील घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मे महिन्यात घडलेल्या या घटनेतील दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. मात्र एकीकडे मणिपूरमध्ये हे प्रकार घडत असताना आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

एका किराणा दुकानात एका महिलेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद असे या जवानाचे नाव आहे. विनयभंगाची ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी जवानाला निलंबित करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद गणवेशात रायफल घेऊन महिलेचा विनयभंग करताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, इंफाळच्या पश्चिम जिल्ह्यात २० जुलै रोजी ही घटना घडली आहे. निमलष्करी दलाकडे तक्रार आल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्याच दिवशी जवानाला निलंबित करण्यात आले आहे. बीएसएफ अशा कृत्यांना खपवून घेणार नाही आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. या जवानाला ईशान्येकडील राज्यात जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले होते, असे बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मणिपूरमध्ये ३ मे पासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या विविध सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ४ मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आलेल्या भयानक घटनेमागे अफवाच कारणीभूत होती, जी सोशल मीडियावर एका महिलेचे पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले मृत फोटो समोर आल्यानंतर घडली होती. हे फोटो समोर आल्यानंतर चुरचंदपूर येथील आदिवासींकडून पीडितेची हत्या केल्याचा खोटा दावा करण्यात आला. या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे फोटो देशाच्या राजधानीत एका महिलेची हत्या झाल्याचे आहेत हे नंतर समजले, पण तोपर्यंत चुरचंदपूर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता आणि दुसऱ्या दिवशी जे काही घडले ते मानवतेला लाज वाटेल असे होते.





  Print






News - World




Related Photos